मित्रांनो, प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्व आहे आणि त्या-त्या महिन्यात विविध व्रत-वैकल्य साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या वर्षी मार्गशीर्ष महिना कधी पासून सुरू होतोय, तसेच किती मार्गशीर्ष गुरुवार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या वर्षी मार्गशीर्ष महिना हा २ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असते. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत आहे, त्याची पूजा विधी, महत्व आणि मान्यता.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा २०२४ मध्ये मार्गशीर्ष महिना २ डिसेंबरपासून सुरु होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा ५ डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे. यंदा मार्गशीर्षचे ४ गुरुवार आहेत. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार १२ डिसेंबर २०२४, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार १९ डिसेंबर २०२४, चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४ .
मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा. चौरंगासमोर रांगोळी काढावी. त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी, त्यावर नारळ ठेवावा. त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे. दागिने, गजरा घालावा. देवीची पूजा करावी. हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे. देवीची आरती करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. ब्राह्मणाला दान द्यावे. सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकू करावे.
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.
अशाप्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेतलेली आहे.